मुंबई | जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची परिषद मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.
अचूक माहिती आणि विशेष घटकांची नोंद
भारताच्या संयुक्त सचिव व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी (महाराष्ट्र) डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनगणनेतील माहिती अचूकपणे संकलित करण्यावर भर दिला. या माहितीमधील त्रुटींचा परिणाम मतदारसंघ पुनर्रचना आणि वैधानिक आरक्षणावर होऊ शकतो. राज्यभरात सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षक तैनात केले जाणार असून, बेघर व्यक्ती, वसतिगृहे, कारागृहे, हॉटेल्स, पेइंग गेस्ट आणि दुर्गम भागांतील लोकांची नोंद घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली, पीई मोबाइल ॲप आणि ऑनलाइन स्वयं-गणना प्रणालीचा वापर केला जाणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील स्थलांतर आणि दाट वस्तीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
वेळापत्रक आणि प्रशिक्षण
प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी तयारीची माहिती दिली. महाराष्ट्रात १० ते २४ जानेवारी २०२७ दरम्यान नागरिक ऑनलाइन स्वयं-गणना करू शकतील. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत प्रगणक घरोघरी जाऊन गणना करतील, तर २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना होईल. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार असून, यात सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती गोळा केली जाईल.
Source: Cosmo News Desk










