नाशिक | वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी कालिदास कलामंदिर येथील ‘जेन झी’ कार्यक्रमात ‘भविष्य’ या विषयावर तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेला घातक पाणीपुरवठा, भीमाशंकर परिसरातील जंगलतोड आणि दुष्काळात डेटा सेंटर उभारण्याचे नियोजन यांसारख्या विविध गंभीर प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी तरुणांनी स्वतः पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
दूषित पाणी आणि नागरिकांचे आरोग्य
नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील भूजल प्रदूषणाचा मुद्दा मांडत सुजात आंबेडकर यांनी क्रोमियमयुक्त पाणी उपस्थितांना दाखविले. पिण्याच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण हजार पटीने अधिक असून यामुळे त्वचारोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या दूषित पाण्यामुळे त्वचाविकाराचा सामना करावा लागत असलेल्या तीन महिलांना त्यांनी आपली आपबिती मांडण्यास सांगितले. जवळपास चार हजार चारशे कुटुंबांना या दूषित पाण्याचा फटका बसला असून, सुमारे वीस ते चोवीस हजार नागरिक यामुळे प्रभावित झाले आहेत, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जंगलतोड आणि डेटा सेंटरचा प्रश्न
भीमाशंकर ते कर्जत परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या जंगलतोडीवर बोलताना त्यांनी सुमारे २३३ ते २७७ हेक्टर क्षेत्रातील हजारो झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त केली. हा उद्योग गुजरातमधील असताना महाराष्ट्रातील जंगलतोड कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच उद्योगांकडून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या आर्थिक देणगीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात प्रस्तावित ३२ डेटा सेंटरच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करताना, एका डेटा सेंटरला दररोज सुमारे २० लाख लिटर पाणी लागते व ३२ डेटा सेंटरसाठी सुमारे सहा कोटी ४० लाख लिटर पाण्याची गरज भासेल, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा तुटवडा असताना डेटा सेंटरसाठी पाण्याचा हा वापर किती योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
Source: Cosmo News Desk





