नाशिक | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी, भविष्यात संभाव्य पाणीटंचाईची समस्या उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. धरणातील मृतसाठ्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी चर खोदण्याची महत्त्वाची योजना महापालिकेने आखली असून, यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
चर खोदण्याच्या कामाला ठेकेदारांचा प्रतिसाद नाही
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट आले होते. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे नाशिक आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न तूर्तास सुटला असला, तरी भविष्यातील धोके टाळण्यासाठी मृतसाठ्यातील पाणी वापरण्याचे नियोजन आहे. गंगापूर धरण मातीचे असल्याने या कामात स्फोटांचा वापर करता येणार नाही. यामुळे विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून खडक फोडत चर तयार करण्याचे ठरले आहे.
तिसऱ्यांदा निविदा काढण्याचा महापालिकेचा निर्णय
प्रकल्प सल्लागार कंपनीने या कामासाठी ११ कोटी ६५ लाख रुपयांचा आराखडा तयार करून आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने निविदा मागवल्या. मात्र पहिल्या निविदेला कोणत्याही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या प्रयत्नात धरणातील आणि भुयारी मार्गातील कामाचा अनुभव असण्याची अट शिथिल करण्यात आली, तरीही ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे आता महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
Source: Cosmo News Desk







