नाशिक | जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इगतपुरी येथील ‘साई निवारा’ येथे रात्रीच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत शिर्डीच्या दर्शनासाठी निघालेले शहापूर परिसरातील अनेक साई भक्त गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिर्डीच्या दर्शनासाठी निघालेले शहापूर परिसरातील काही साई भक्त इगतपुरी येथील ‘साई निवारा’ येथे मुक्कामाला थांबले होते. दिवसभराचा प्रवास आणि जेवण आटपून हे सर्वजण रात्री निवाऱ्यात शांतपणे विश्रांती घेत होते.
मध्यरात्री घडली दुर्घटना, परिसरात पसरली भीती
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या या दुर्घटनेत निवाऱ्याच्या स्लॅबचे गर्डर आणि लोखंडी-सिमेंटच्या फरशा थेट खाली झोपलेल्या भाविकांच्या अंगावर कोसळल्या. या अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच तारांबळ उडाली. स्लॅब कोसळण्याच्या मोठ्या आवाजामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. जेवणानंतर विश्रांती घेत असताना हा भीषण अपघात घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल, प्रशासनाकडून तपास सुरू
या दुर्दैवी अपघातात १५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना समजताच स्थानिक नगरसेवक राज जावरे, पोलीस यंत्रणा आणि महामार्ग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतीसाठी पुढे येत या सर्वांनी मिळून सर्व जखमी साई भक्तांना तातडीने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.
Source: Cosmo News Desk






