मुंबई | संरक्षित सिंचन शेती क्षेत्रातील शेतकरी, हरितगृह आणि शेडनेट उत्पादक, उद्योजक तसेच सेवा पुरवठादारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच संबंधित घटकांना भेडसावणारे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
‘इंडियन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या वतीने संरक्षित शेती आणि सिंचन क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभाग आणि कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या वतीने एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सचिव परिमल सिंह, ऑनलाईन आयुक्त सूरज मांढरे, प्रकल्प संचालक मीनल करनवाल तसेच ‘इंडियन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे मनोज मानगावे, चेतन दहीया आणि इतर सदस्य उपस्थित होते.
शासकीय योजनांमध्ये संरक्षित शेतीचा समावेश
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कृषी समृद्धी योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांमध्ये संरक्षित शेतीचा समावेश करण्याबाबत संबंधितांना अवगत करण्यात येत आहे. या माध्यमातून संरक्षित सिंचन क्षेत्रातील शेतीचा विस्तार करण्यावर आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जात आहे.
जालना जिल्ह्यातील पुरवठादारांना सुनावणीची संधी
बैठकीत जालना जिल्ह्यात काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ४४ सेवा पुरवठादारांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार लेखी स्वरूपात बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. फलोत्पादन संचालनालयामार्फत त्यांची पुन्हा सुनावणी घेण्याचे प्रस्तावित आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार संरक्षित सिंचन शेतीअंतर्गत फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके तसेच औषधी वनस्पतींचा समावेश करणे आणि जुन्या हरितगृह व शेडनेटच्या दुरुस्तीचे प्रश्न यांसारख्या विषयांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Source: Cosmo News Desk










