Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे ज्ञानकोश: अमित शाह
Maharashtra

अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे ज्ञानकोश: अमित शाह

पुणे येथे दिवंगत अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मान्यवर

पुणे | केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र चव्हाण, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

अजितदादांचे सहकार आणि ग्रामीण विकासातील योगदान

दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँка आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. त्यांची कार्यपद्धती नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, असेही शाह म्हणाले. अजितदादा अखेरपर्यंत पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांसाठी आग्रही होते. साखर कारखान्यांवरील प्राप्तिकराचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. बारामतीला देशातील सर्वाधिक विकसित मतदारसंघांपैकी एक बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना ते कणखर, शिस्तप्रिय, प्रशासनावर पकड असलेले आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असल्याचे सांगितले. वित्तमंत्री म्हणून कठीण परिस्थितीतही त्यांनी आर्थिक शिस्त कायम राखली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हटले असून, पुणे मेट्रो, रिंग रोड आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका मोलाची होती असे नमूद केले.

पुतळा अनावरण आणि ‘कर्मयोगी दादा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हा क्षण अत्यंत भावनिक असल्याचे सांगत, ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले त्याच प्रांगणात त्यांचा पुतळा उभारला जात असल्याचे नमूद केले. अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी प्रास्ताविकात ग्रामीण विकासातील अजितदादांच्या योगदानाची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने अजितदादांच्या कार्यकाळातील ग्रामविकासकामांची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली आणि ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी अजितदादांच्या जीवनकार्याला समर्पित ‘ट्रिब्युट गॅलरी’ला भेट दिली. या छायाचित्र प्रदर्शनीत पुणे जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाचा दुर्मिळ छायाचित्रांद्वारे आढावा मांडण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts