Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सिंहस्थ कुंभमेळा: साधुग्राममध्ये १५५ कोटींच्या जलव्यवस्थापनाला सुरुवात
Nashik

सिंहस्थ कुंभमेळा: साधुग्राममध्ये १५५ कोटींच्या जलव्यवस्थापनाला सुरुवात

नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये दहा लाख साधू-महंत आणि भाविकांच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी सुमारे १५५ कोटी रुपये खर्चून जलवाहिन्या आणि पाणी वितरण यंत्रणेचे जाळे उभारण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, साधुग्राममध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग आला आहे. नाशिक महापालिका आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून तपोवनातील प्रस्तावित साधुग्रामच्या नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे. प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नाशिकमध्ये साधू-महंत, आखाडे आणि खालशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाणीपुरवठा आणि जलवाहिन्यांचे जाळे

प्रस्तावित साधुग्राममध्ये दहा लाख साधू-महंत आणि भाविकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने स्वतंत्र जलवाहिन्या व वितरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त ६३५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. या पाण्यातून साधुग्रामला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विस्तारित मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे साधुग्राम परिसरात पाणी आणले जाणार असून या जलवाहिनीचे कामही प्रगतिपथावर आहे.

सांडपाणी व्यवस्थापन व इतर सुविधा

पाणीपुरवठ्याबरोबरच साधुग्राममध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मलनिस्सारण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक निविदा प्रक्रियेद्वारे या कामाचा ठेका दिला जाणार असून, साधुग्रामच्या प्रस्तावित क्षेत्रात मलवाहिन्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या साधू-महंत आणि भाविकांच्या पाणीपुरवठ्यासह स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंदा तब्बल १ हजार ३८० एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे नियोजन असून, निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तीन प्रमुख आखाड्यांसाठी स्वतंत्र सेक्टर उभारले जाणार आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts