Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी इमारती उत्कृष्ट – आदिती तटकरे
Maharashtra

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी इमारती उत्कृष्ट – आदिती तटकरे

नंदुरबारमधील आधुनिक अंगणवाडी इमारतीचे छायाचित्र

नंदुरबार | जिल्ह्यातील नवनिर्मित अंगणवाड्यांच्या इमारती राज्यातील उत्कृष्ट इमारतींपैकी एक असून येथे बालकांच्या शिक्षणासह पोषण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी उत्तम सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्याने सुपोषणाच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. जिल्हा परिषद, नंदुरबार व महिला व बालविकास विभाग यांच्या सहकार्याने फीडिंग इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तळोदा तालुक्यातील मोरवड येथील प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार राजेश पाडवी, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल उपस्थित होते.

आधुनिक सुविधा आणि पोषण व्यवस्था

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी हवेशीर वर्गखोल्या, पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी सुविधा, पौष्टिक आहार, सुसज्ज स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, खेळण्याच्या सुविधा आणि संरक्षक भिंत यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत इमारत एकाच परिसरात असल्याने बालकांना सुरक्षित वातावरण मिळत आहे. या इमारतींची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट केली जाणार आहे. फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वयंपाकघरातून सध्या दररोज सुमारे ५ हजार ८०० बालकांना दोन वेळेचा आहार दिला जात असून डिसेंबरपासून २० ते २५ हजार बालकांना भोजन देण्याचे नियोजन आहे. पहिल्या एक हजार दिवसांत बालकाच्या मेंदूचा ९० टक्क्यांपर्यंत विकास होत असल्याने बालकांसोबतच मातांच्या पोषणावरही भर देणे आवश्यक आहे.

ईपीडीएस मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पाहणी

नंदुरबार दौऱ्यादरम्यान सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यम कुपोषित बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या एनर्जी प्रोटीन डेन्स सप्लिमेंटच्या निर्मिती युनिटला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उत्पादन प्रक्रियेची माहिती घेत कुपोषित बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच प्रधानमंत्री मातृत्व योजना आणि लेक लाडकी योजनेचे धनादेश व बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts