अहिल्यानगर | अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे ८ नोव्हेंबर १८०५ रोजी आदिवासी समाजातील महादेव कोळी कुटुंबात राघोजी रामजी भांगरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामजी भांगरे हे शूर योद्धे आणि किल्लेदार होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समराच्याही आधी आदिवासी समुदायातील या आद्यक्रांतिकारकाने इंग्रजांना आणि जुलमी सावकारांना सळो की पळो करून सोडले होते. राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आदिवासींचा बुलंद आवाज घुमला आणि आदिवासी समाजाने स्वतःला स्वातंत्र्य युद्धाच्या अग्नीत झोकून दिले. पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळी समाजाचे सह्याद्रीतील किल्ल्यांचे आणि घाटमाथ्याचे परंपरागत रक्षणाचे अधिकार काढून घेतले आणि शेतसारा प्रचंड वाढवला. सावकारांनी जमिनी बळकावण्यास सुरुवात केल्यामुळे राघोजींनी अन्यायाविरोधात बंडाचे निशाण हाती घेतले.
रतनगड किल्ला आणि ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला रतनगड हा सह्याद्रीच्या डोंगररांगांतील अत्यंत मोक्याचा किल्ला असून महादेव कोळी समाज परंपरागतपणे या किल्ल्याचा रक्षक होता. ब्रिटिशांनी रतनगड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर, १८२१ मध्ये रामजी भांगरे यांनी गोविंदराव खाडे आणि रामा किरवा यांच्या मदतीने रतनगडावर जाहीर बंड केले. या बंडात वयाच्या १६ व्या वर्षी राघोजी भांगरे आपल्या वडीलासोबत सहभागी झाले होते. इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉशने ५,००० सैन्य घेऊन गडावर चाल केली असता, रामजी भांगरे यांच्या ५०० आदिवासी सैनिकांनी कडवी झुंज दिली. या युद्धात इंग्रजांचे ३,५०० सैनिक मारले गेले. पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राघोजी आणि त्यांचे बंधू बापूजी भांगरे यांनी महादेव कोळी व भिल्ल तरुणांच्या टोळ्या संघटित केल्या. १८३८ मध्ये त्यांनी रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात इंग्रज सत्तेविरुद्ध मोठा उठाव केला. राघोजींना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची संपूर्ण माहिती असल्याने ते इंग्रजी फौजांवर अचानक छापे टाकून डोंगरात गायब होत असत.
उठावाचा विस्तार आणि बलिदान
राघोजींनी आपले बंधू बापूजी भांगरे आणि सहकाऱ्यांच्या मदतीने अकोले, जुन्नर, नाशिक, ठाणे, पुणे आणि सातारा परिसरात इंग्रज व जुलमी सावकारािरुद्ध मोठा उठाव केला. ते सावकारांची संपत्ती आणि कर्जाची कागदपत्रे जाळून लुटलेले धन गोरगरिबांना वाटत असत, ज्यामुळे सामान्य जनतेत त्यांना देवासारखा मान मिळाला. गनिमी काव्याने लढणाऱ्या राघोजींना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी १८४४ ते १८४५ या काळात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि नाशिक जिल्ह्यातील इंग्रज ठाण्यांवर हल्ले केले आणि कॅप्टन मॅकिंटॉशच्या फौजेशी संघर्ष केला. त्यांनी खानदेश आणि नगरमधील भिल्ल नायकांना एकत्र आणून १८४८ मध्ये पंढरपूर येथे भिल्ल सरदारांची भेट घेऊन मोठ्या लढ्याची योजना आखली. १८४८ मध्ये पंढरपूर येथे वेषांतर करून देवदर्शनासाठी आणि भिल्ल नायकांना एकत्र आणण्यासाठी आलेले असताना इंग्रजांनी विश्वासघाताने त्यांना अटक केली. ठाणे येथील न्यायालयात खटला चालवून, २ मे १८४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. त्यांची समाधी शहापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे आहे.
Source: Cosmo News Desk








