Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यातील सर्व ग्राहक आयोगांमध्ये ऑनलाइन सुनावणी अनिवार्य
Maharashtra

राज्यातील सर्व ग्राहक आयोगांमध्ये ऑनलाइन सुनावणी अनिवार्य

ग्राहक तक्रार निवारण आयोगाची बैठक आणि ऑनलाइन सुनावणी

मुंबई | राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सर्व सर्किट बेंचमध्ये नियमित कामकाजाचा भाग म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन सुनावणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. ही ऑनलाइन सुनावणी प्रत्यक्ष सुनावणीला पर्यायी नसून एक अतिरिक्त सुविधा आहे, ज्यामुळे वकील आणि पक्षकारांना त्यांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. आयोगाच्या मुख्यालयापासून दूर राहणाऱ्या वकील व पक्षकारांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. या सुविधेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रभारी अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांनी राज्यातील जिल्हा ग्राहक आयोगांचे अध्यक्ष, सदस्य आणि निबंधक यांच्यासोबत अनेक ऑनलाइन बैठका घेतल्या असून प्रत्येक जिल्हा आयोगाकडे वैयक्तिक स्तरावर पाठपुरावा केला आहे. दरम्यान, ऑनलाइन सुनावणी सुरू करणाऱ्या पहिल्या दहा जिल्हा आयोगांच्या अध्यक्ष, सदस्य आणि निबंधकांना प्रशंसापत्र देण्याची घोषणाही करण्यात आली होती, ज्यानुसार अनेक आयोगांनी ही सुविधा सुरू केली असून वकील आणि पक्षकारांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना

ऑनलाइन सुनावणीच्या प्रक्रियेत एकसमानता आणण्यासाठी राज्य आयोगाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी परिपत्रक जारी केले आहे. या नियमांनुसार, आयोगाचे कामकाज सुरू झाल्यापासून न्यायपीठाचे कामकाज संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू ठेवणे बंधनकारक आहे. सुनावणीसाठी ठरावीक वेळ किंवा दिवसातील काही तासांची मर्यादा ठेवता येणार नाही. तसेच, यामध्ये सहभागी होण्यासाठी अनावश्यक अर्ज, पूर्वपरवानगी, विशिष्ट नमुने किंवा जटिल कार्यपद्धतींचा आग्रह धरता येणार नाही. प्रत्येक आयोगाने आपल्या दैनंदिन कामकाजाच्या सूचीमध्ये म्हणजेच कॉज लिस्टमध्ये ऑनलाइन सुनावणीची लिंक प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी सर्व आयोगांना पुरेसा वेळ, तांत्रिक सहाय्य आणि वारंवार सूचना देण्यात आल्या असून, तरीही निर्देशांचे पालन न करणाऱ्या किंवा क्षुल्लक कारणांवरून ऑनलाइन सुनावणी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि या निष्काळजीपणाची नोंद संबंधित अधिकाऱ्याच्या सेवा अभिलेखात केली जाईल, असा अंतिम इशारा देण्यात आला आहे.

न्यायालयीन शिष्टाचार आणि नियम

ऑनलाइन सुनावणी ही आयोगाच्या नियमित न्यायिक कामकाजाचाच भाग असल्याने न्यायालयीन शिस्त आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. सुनावणीच्या निर्धारित वेळेच्या काही मिनिटे आधी सहभागी व्हावे, कॉज लिस्टमधील प्रकरणाचा अनुक्रमांक आणि स्वतःचे नाव दर्शवावे. सहभागी होणाऱ्यांनी शांत, पुरेशा प्रकाशाच्या ठिकाणाहून आणि स्थिर इंटरनेट सुविधेसह सामील व्हावे. वकिलांनी व्यावसायिक पोशाखात तर पक्षकारांनी योग्य पोशाखात उपस्थित राहावे. प्रकरण पुकारले जाईपर्यंत मायक्रोफोन बंद ठेवावा आणि बाजू मांडताना कॅमेरा सुरू ठेवावा. परवानगीशिवाय बोलणे, इतर कामे करणे तसेच कामकाजाचे रेकॉर्डिंग, छायाचित्रण किंवा प्रसारण करण्यास सक्त मनाई आहे. अयोग्य किंवा अवमानकारक वर्तन करणाऱ्या व्यक्तीला सुनावणीतून वगळण्याचा अधिकार न्यायपीठाला असेल. या प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित आयोगाच्या निबंधकांशी आणि समस्या न सुटल्यास राज्य आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांकडे लेखी तक्रार करता येईल. प्रशासकीय प्रबंधक उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रкаद्वारे ही माहिती दिली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts