मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आणि सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार यांसारखी शिवकालीन शस्त्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून आणि सर्व नियमांचे पालन करत महाराष्ट्रात परत आणणे ही आपली जबाबदारी होती. सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष प्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान हे विचार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने झाली, ज्यामध्ये अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग सादर करण्यात आला. तसेच यावेळी ‘दांडपट्टा’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सभ्यासाची मुखर्जी, संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, विश्वस्त सायरस गुजर आणि शाहीर नंदेश उमप उपस्थित होते.
प्रदर्शनात कोणती शस्त्रे पाहता येणार
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, शस्त्रे ही केवळ पराक्रमाची प्रतीके नसून ती धैर्य, अभियांत्रिकी कौशल्य, धातुशास्त्र आणि अचूक नियोजनाचे दर्शन घडवतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि भारतीय दूतावासाच्या सहकार्याने हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात आले असून, आज भारतीय नौदलाच्या ध्वजावर आणि पोशाखावरही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकत आहे. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल आणि सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसह अनेक ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्वांसाठी खुले राहणार असून इतिहासप्रेमींनी याला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहालय आणि संचालनालयाची भूमिका
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, या प्रदर्शनाच्या आयोजनामुळे शिवकालीन शस्त्रपरंपरेच्या अभ्यासाला आंतरराष्ट्रीय परिमाण मिळाले आहे. वाघनखे आणि तलवार भारतात परत आणताना तापमान नियंत्रण, सुरक्षित अंतर आणि योग्य प्रकाशयोजना यांसारख्या सर्व आंतरराष्ट्रीय मानकांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार करून हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. यापूर्वी सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथे या प्रदर्शनाला लाखो नागरिकांनी भेट दिली आहे.
Source: Cosmo News Desk











