यवतमाळ | राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघातील मौजे हुडी खुर्द (ता. पुसद) येथील शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या शुभहस्ते पार पडले. या योजनेंतर्गत हुडी खुर्द येथील सर्वे क्रमांक २५ ते १० पर्यंतच्या शेतरस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कामासाठी १८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्याची एकूण लांबी १ हजार ३०० मीटर आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी हे काम मंजूर करण्यात आले आहे.
शेतरस्त्याची वैशिष्ट्ये आणि उद्देश
शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्या-येण्यासाठी बारमाही रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी तसेच शेतीच्या कामांसाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या रस्त्यामुळे हुडी खुर्द येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीच्या दैनंदिन कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे परिसरातील कृषी वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रसंगी उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाप्रसंगी पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विजय जाधव, प्रगतशील शेतकरी तथा समिति सदस्य बाबूसिंग आडे, भगवानराव असोले, रणवीर पाटील, नायब तहसीलदार सि.डी.राठोड, उपअधीक्षक भूमिअभिलेख अशोक राठोड, तालुका कृषी अधिकारी व्ही.टि.मुकाडे, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता विनोद चव्हाण उपस्थित होते. तसेच गावचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी हजर होते.
Source: Cosmo News Desk








