नाशिक | दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतबाजीतमुळे निर्माण झालेल्या धुराने आणि वाढत्या वायुप्रदूूषणामुळे गुदमरलेल्या नाशिककरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर शहरातील हवेच्या गुणवतेत लक्षणीय सुधारणा झाली असून, खराब श्रेणीत पोहोचलेला हवा गुणवत्ता निर्देशांक अवघ्या तीन दिवसांत मध्यम श्रेणीत आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी २३२ वर असलेला शहराचा सरासरी एक्यूआय १० नोव्हेंबरला थेट १५४ वर घसरला, तर ११ नोव्हेंबरला तो १५४ वर नोंदविण्यात आला.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि विविध भागांतील स्थिती
फटाक्यांमधून बाहेर पडणारे सूक्ष्म धुलिकण, वाहनांचा धूर, बांधकामामुळे हवेत पसरणारी धूल आणि थंडीच्या दिवसात वातावरणात जमिनीत साचून राहणारे प्रदूषक यांचा एकत्रित परिणाम शहराच्या हवेवर झाला होता. परिणामी, शहरातील चारही प्रदूषण मापन केंद्रांवर हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत पोहोचला होता. मात्र, दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर फटाक्यांचा धूर निवळणे, वाऱ्याची हालचाल आणि आपापणातील बदल यामुळे वातावरणातील प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. ११ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार पांडवनगरीत सर्वाधिक १८४ एक्यूआय नोंदवला गेला, तर हिवरवाडीत १५२, गंगापूर रस्त्यावर १४८ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत सर्वात कमी १३२ एक्यूआय नोंदवला गेला.
नागरिकांसाठी आरोग्याची काळजी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार, ० ते ५० एक्यूआय चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिशय खराब, तर ४०१ ते ५०० गंभीर श्रेणी मानली जातील. सध्या नाशिकचा एक्यूआय मध्यम श्रेणीत आला असला, तरी याचा अर्थ शहरातील हवा पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाली असा होत नाही. मध्यम श्रेणीतील हवेमुळेही संवेदनशील नागरिकांना त्रास जाणवू शकतो. दमा आणि हृदयविकार असलेले रुग्ण, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ आणि दम लागणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषणाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असलेल्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे.
Source: Cosmo News Desk






