नाशिक | क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जात असून, या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात आजपासून जनजातीय गौरव सेवा सप्ताह सुरू झाला आहे. या विशेष सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आदिवासी आयुक्तालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची घोषणा केली. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ पाच एकर परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक असून जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
ओझरखेड धरण परिसरात स्मारकाची उभारणी
ओझरखेड धरण परिसरात भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या कामासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत धरण परिसरात पर्यटन सुविधांचा विकास केला जाईल आणि २१ फूट उंच पुतळ्याची उभारणी व वृक्षारोपण केले जाईल. या विकासकामामुळे ओझरखेड धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यास मदत होणार असून स्थानिक पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्यास हातभार लागेल. जिल्हा विकास आराखड्यांतर्गत उपलब्ध झालेल्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला गती मिळत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा आणि आदिवासी समाजाच्या संघर्षाचा गौरव केला जाणार आहे. पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उधमाळ येथे विकसित होणाऱ्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली, तर आयुक्त श्रीमती बनसोड यांनी शबरी नॅचरल ब्रँडच्या डिझाईनला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांसोबतच घरकुल, शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. या सेवा सप्ताहामध्ये न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप, स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, आधार कार्ड व कागदपत्रे सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृतीपर शिबिर आणि आदिवासी सक्षमीकरण दिवस साजरे केले जाणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील राहणार असून, हा उपक्रम आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
Source: Cosmo News Desk





