मुंबई | शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ शासकीय निवासस्थानी दिव्यांग बांधवांसाठी एका दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसमवेत फराळ करत त्यांना भेटवस्तू दिल्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या माणसांच्या आयुष्यातील अंधार दूर करून आशेचा आणि विश्वासाचा दिवा लावणे म्हणजे खरी दिवाळी असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, नंदनवन हे निवासस्थान सर्वसामान्य, गरजू आणि दिव्यांग बांधवांसाठी हक्काचे ठिकाण आहे. दिव्यांग बांधवांमधील जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाने आपली खरी दिवाळी साजरी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांच्या महागड्या शस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांटमुळे ऐकू-बोलू लागलेल्या मुलांच्या कुटुंबीयांसोबतही नुकतीच दिवाळी साजरी केल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाचे विविध उपक्रम
दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, दिव्यांगांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘दिव्यांग मंत्रालय’ स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रालयामुळे अनेक दिव्यांग बांधवांना रोजगार मिळाला असून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी एक टक्के निधी थेट दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय (जयपूर फूट), वॉकर, श्रवणयंत्र आणि इतर आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हा उपक्रम केवळ एका शहरापुरता मर्यादित न ठेवता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचवला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या स्नेहमेळाव्यात उपस्थित लोकांच्या भावनांमुळे नंदनवन हे निवासस्थान खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांसाठी आनंदवन बनल्याची चर्चा होती.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन
यंदा दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजातील हजारो हातांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. ही राजकारणाची वेळ नसून संकटग्रस्तांच्या पाठीशी माणुसकीने उभे राहण्याची वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source: Cosmo News Desk











