अहिल्यानगर | दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये, असे स्पष्ट करत राज्य शासन प्रत्येक संकटात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भूमिका पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. दुष्काळ निवारणासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून समन्वयाने काम करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करण्यात आली आणि त्यांना दिवाळीचा फराळ व कपडे सुपूर्द करण्यात आले. पालकमंत्री आणि आमदारांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला तसेच गावातील इतर कुटुंबीयांनाही फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
चारा उत्पादन आणि पाणीटंचाईचे नियोजन
दुष्काळात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जाईल. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना, आवश्यक तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून पाणी शुद्ध व सुरक्षित असणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामस्थांच्या समस्यांवर प्रशासनाला तातडीच्या सूचना
या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, रेशनवरील धान्यपुरवठा, संजय गांधी निराधार योजना, बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता यांसारखे विविध प्रश्न मांडले. रेशनकार्ड असूनही धान्य न मिळाल्याच्या तक्रारीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक आणि गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk








