नाशिक | संवेदनशील आणि हायप्रोफाइल गुन्हेगारांचा मुक्काम असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कैद्यांतील टोळीयुद्ध, प्राणाघातक हल्ले, अमली पदार्थांचे सेवन, मोबाइलचा सर्रास वापर, सोशल मीडियावर व्हायरल होणारे कैद्यांचे व्हिडिओ आणि लाचखोरीच्या कथित प्रकारांमुळे आधीच चर्चेत असलेल्या कारागृहात आता चक्क सुरक्षाक्षकच अमली पदार्थांच्या तस्करी सहभासी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रवींद्र एकनाथ पाटील ताब्यात
रवींद्र एकनाथ पाटील (वय ३५, नेमणूक मध्यवर्ती कारागृह) असे या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या कारागृह रक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह तुरुंग अधिनियमंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वारवर आणि झडती कक्षात सुरक्षा तपासणीची यंत्रणा कार्यरत असतानाही संबंधित कर्मचाऱ्याने अमली पदार्थ आत नेण्याचा प्रयत्न केल्याने या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मागच्या महिन्यात कारागृहाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतरही कारागृहातील गैरप्रकारांना आळा बसलेला नसत्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
स्मार्टफोन बंदी आणि गैरप्रकार
नाशिकरोड कारागृहात मोबाइल वापरवर कठोर बंदी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, क्वॉरंटाइन वॉर्डमध्ये सराईत बंदीवान कॅरम खेळतानाचे आणि मोबाइलवर चित्रीकरण करून ते इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याचे व्हिडिओ यापूर्वी समोर आले होते. सनी पगारे आणि श्रींजय उर्फ गौरव खाडे या बंदीवानांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. जामिनावर बाहेर आलेला काही कैद्यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकारी आणि संशयित बंदीवानांच्या कथित संगनमतून कारागृहातील गैरप्रकारांना अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे कैद्यांवर प्राणाघातक हल्ले आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडल्या आहेत.
Source: Cosmo News Desk






