Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • महाराष्ट्रातील सहकार व्यवस्था मोडित काढण्याचा डाव – बाळासाहेब थोरात
Nashik

महाराष्ट्रातील सहकार व्यवस्था मोडित काढण्याचा डाव – बाळासाहेब थोरात

नाशिक | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. सत्ता नसलेल्या ठिकाणी चोरट्या मार्गाने नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून नियम आणि कायदे बदलले जात आहेत. महाराष्ट्रातील सहकार व्यवस्था मोडित काढण्याचा हा मोठा कट असून, मुख्यमंत्र्यांनी या पापाचे धनी होऊ नये, असा संतापजनक इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीसाठी थोरात नाशिक येथे आले होते. यावेळी गुरुवारी (दि. ५) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सहकार क्षेत्रावर घाला आणि गोकुळ दूध संघ

महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या गोकुळ दूध संघास साडेपाच लाख शेतकरी जोडलेले आहेत. आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या पॅनलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही, केवळ १४ च्या कोरचा नियम आड आणून अध्यक्षनिवड रोखली जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला. हा कोरचा नियम तातडीने दुरुस्त केला पाहिजे. मात्र, शासन चार स्वीकृत सदस्य नेमून नियमबाह्य पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही केवळ एका दूध संघापुरती बाब नसून, सहकारी बँका, साखर कारखाने आणि विकास सोसायट्या ताब्यात घेण्याचा हा षडयंत्र आहे. सहकाराचा पाया मोडून शेवटी राज्यातील दूध व्यवसाय ‘अमुल’च्या घाशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात कोल्हापूरमध्ये निघणाऱ्या देशव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळा नियोजन आणि दुष्काळी परिस्थितीवर टीका

नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर टीका करताना थोरात म्हणाले की, देवाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असून, अयोध्येत जे घडले, तेच नाशिकमध्ये चालले आहे. केवळ आरतीसाठी १८ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी तो निधी टँकर आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरला असता, तर जनतेचे आशीर्वाद मिळाले असते. नाशिककरांना सध्या सुरू असलेला हा गोंधळ उघड्या डोळ्यांनी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी १९७२ च्या दुष्काळाची आठवण काढली. हेक्टरी पाच हजार रुपयांच्या मदतित शेतकरी पुढील १० महिने कसा जगेल, असा सवाल करत शासनाने शेतकरी, शेतमजूर आणि बारबलुतेदारांचा विचार केला नसल्याचे नमूद केले. जिल्हा बँक ही मातृसंस्था असून, सहकार टिकला तर संस्था चांगल्या चालतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts