मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करून उद्योग उभारावेत आणि जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील भारताच्या प्रगतीचे भागीदार व्हावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिक्कीच्या व्यासपीठावरून केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्यावतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोर्ट आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी, पायाभूत सुविधांचा विकास आणि भविष्यातील योजनांबाबत भूमिका मांडली.
या कार्यक्रमास फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विजय शंकर, ध्रुव गौतम, कॅप्टन अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे गौरव दयाल, नेदरलॅंडचे जेरीवेल हेल्डन, शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी, ओडिशा कॉमर्स आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव एन बी एच राजपुत आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित होते. महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी अनुकूल व्यवस्था यामुळे बंदर उद्योगासाठी महाराष्ट्र महत्त्वाचे केंद्र ठरू शकते, असे मंत्री राणे यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधा आणि ७६ हजार कोटींचे करार
राज्यातील मेरिटाइम क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना देण्यात येत असून, या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील संधींना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वन विंडो क्लिअरन्स’सारख्या सुविधांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या सागरी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पनांवर भर देण्यात येत आहे. मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे तसेच निर्यातीला चालना देणे याद्वारे महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रोजगाराच्या नव्या संधी आणि राष्ट्रीय योगदान
महाराष्ट्राच्या नैसर्गिक भौगोलिक सामर्थ्याला औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देऊन राज्याच्या बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रातील उपलब्ध संधींचा लाभ घेऊन बंदर व जहाज बांधणी, दुरुस्ती क्षेत्रात उद्योग उभारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचा विस्तार होणार नाही, तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने ही समिट निश्चितच महत्त्वाची ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Source: Cosmo News Desk











