मुंबई | भारताची विविधता हीच देशाची सर्वात मोठी ताकद असून, नागरिकांनी विविध भागांना भेट देऊन संस्कृती अनुभवली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आंध्रप्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित क्षेत्रातील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक देवाणघेवाणीतून एकात्मता बळकट करण्याचे आवाहन
राज्यपाल वर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतातील राज्ये विविधरंगी फुलांप्रमाणे असून त्यातून सुंदर पुष्पगुच्छ साकारला आहे. केंद्र शासनाने १९५३ मध्ये फजल अली आयोगाची नियुक्ती केली होती, ज्याच्या शिफारशींनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यासह १४ राज्ये व सहा केंद्रशासित प्रदेश झाले. पुढे १९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगढ़ राज्याची निर्मिती झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंध केला असून, त्याचे ‘श्रेष्ठ भारत’मध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी १४० कोटी भारतीयांची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार या उपक्रमास प्रेरणा देतात.
ऐतिहासिक संबंध आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे
शतकानुशतके समान सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाने भारत जोडलेला आहे. आद्य शंकराचार्य, संत नामदेव, शीख गुरू गोविंदसिंह आणि स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा उल्लेख करत राज्यपालांनी भारताकडे जगाला शांतता व प्रगतीचा मार्ग दाखविण्याची क्षमता असल्याचे म्हटले. कार्यक्रमात दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक सादर केले, तर तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, हरियाणा, लक्षद्वीप यांनी लोकनृत्य, केरळने काईकोट्टिकली, पंजाबने भांगडा, कर्नाटकने तुला पद्य आणि दिल्लीने कथ्थक सादर केले. अंदमान-निकोबार व पुद्दुचेरीची ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
Source: Cosmo News Desk











