नाशिक : गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या थेट जलवाहिनी प्रकल्पाची दिलेली डेडलाइन पुन्हा एकदा उलटली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही २०० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचे काम अद्यापही अपूर्णच राहिले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने ऑक्टोबरची मुदत दिली होती, परंतु या अवधीतही काम पूर्ण होऊ शकले नाही. आता प्रशासनाकडून चाचणीचे नियोजन केले जात असून, नव्या जलवाहिनीद्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना नोव्हेंबरअखेरची वाट पाहावी लागणार आहे.
प्रकल्पाची गरज आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
शहराची वाढती लोकसंख्या आणि जुन्या जलवाहिनीची झालेली दूरवस्था यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. १८०० मिमी व्यासाच्या या जलवाहिनीमुळे पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि सिडको या विभागांतला पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे. ‘जिंदाल’ कंपनीकडून हे काम केले जात आहे. महापालिकेने मक्तेदाराला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती, तरीही काम पूर्ण न झाल्याने १ मेपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. १ ते १५ मेदरम्यान दररोज एक लाख रुपये, तर १६ मेपासून दररोज अडीच लाख रुपये दंड आकारला जात आहे. आतापर्यंत ठेकेदारावर सव्वाशे कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून, दंडाची रक्कम अद्याप देयकातून वसूल झालेली नाही.
दिवाळीनंतर दोन दिवसांचे शटडाऊन
पुढील आठवड्यात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात थेट जलवाहिनीची अंतिम जोडणी केली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण जलवाहिनीची चाचणी घेतली जाईल. या चाचणी प्रक्रियेसाठी दिवाळीनंतर १४ व १५ नोव्हेंबरला दोन दिवसांचा शटडाऊन घेण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे. आधीच १० टक्के पाणीपातळी अटळ बनली असताना सलग दोन दिवसांचा शटडाऊन नागरिकांवर मोठे संकट निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील जोडणीला आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Source: Cosmo News Desk





