मुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा यांची एक विशेष मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण, पोषण आहार तसेच दुष्काळग्रस्त भागांतील महिला व बालकांच्या कल्याणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला आहे. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागाकडून कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, विभागाचे प्राधान्यक्रम काय आहेत आणि आगामी काळात काय नियोजन आहे, याबाबत आयुक्त लड्डा यांनी या मुलाखतीतून माहिती दिली आहे.
प्रमुख कल्याणकारी योजनांची माहिती
या मुलाखतीदरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’, तसेच प्रस्तावित बालधोरण आणि एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या प्रस्तावित धोरणावर चर्चा करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जात आहे, यावर प्रकाश टाकला गेला आहे. तसेच, लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे, जनजागृती वाढवणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम बनवण्यासाठी विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देखील आयुक्त वर्षा लड्डा यांनी दिली आहे.
दुष्काळग्रस्त भाग आणि बालसंरक्षणविषयक उपाय
दुष्काळ व टंचाईग्रस्त भागांतील महिला, गर्भवती व स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्या व पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, यावर या मुलाखतीत विशेष चर्चा झाली आहे. रोजगारासाठी स्थलांतर करावं लागणाऱ्या कुटुंबांतील महिला आणि बालकांना अंगणवाडी सेवा, पोषण आहार, आरोग्य सुविधा आणि शिक्षण मिळवून देण्याच्या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, बालविवाह, बालतस्करी, बालमजुरी आणि बालभिक्षेकरी यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना, बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संबंधित कायद्यांची कडक अंमलबजावणी याविषयीही यामध्ये चर्चा आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावाही या मुलाखतीत घेण्यात आला आहे.
Source: Cosmo News Desk











