Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • लासलगावमध्ये २२ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर वितरण सुरू
Nashik

लासलगावमध्ये २२ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर वितरण सुरू

नाशिक | लासलगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेल्या घरगुती गॅस सिलिंडर वितरणाला अखेर २२ दिवसांच्या खंडानंतर गती मिळाली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जाधव गॅस एजन्सीविरोधात लासलगाव शहर विकास समितीने केलेल्या ढोल-ताशे बजाव आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्यामुळे हे वितरण सुरू झाले आहे. सोमवारी सायंकाळी २५० सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे.

वितरण सुरळीत करण्याचे उद्दिष्ट

मंगळवारी आणखी ५०० सिलिंडर वितरित करण्यात आले असून बुधवारपर्यंत शहरातील एक हजार प्रलंबित बुकिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाधव गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर बनबेरू यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन बुकिंग करून आणि पैसे भरूनही सिलिंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. सणासुदीच्या काळात २० दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी शनिवारी लासलगाव शहर विकास समितीने जोरदार निषेध आंदोलन केले होते.

ग्रामीण भागासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि आवाहन

लासलगाव शहर व परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सी. डी. पटणी गॅस एजन्सी येवला आणि कातकडे गॅस एजन्सी मनमाड यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित बुकिंग पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, सर्व ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन लासलगाव शहर विकास समितीसह निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts