नाशिक | राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार गोकुळ गीते, आमदार किशोर दराडे, आमदार सीमा हिरे, प्रधान सचिव नविन सोना, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाई आणि मदत वाटपाबाबत सूचना
आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा पुरेल अशा प्रकारचे नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. पीक नुकसानीचे पंचनामे, अर्जांची पडताळणी आणि आर्थिक मदतीचे वितरण पारदर्शक व वेगाने पूर्ण करावे. शेतकऱ्यांना कागदपत्रे किंवा आधार प्रमाणीकरणात अडचणी आल्यास त्यांचे स्थानिक स्तरावर तातडीने निराकरण करून बँक खात्यात वेळेत मदत जमा करावी. संकटकाळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये, तसेच राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांनी व सूक्ष्म वित्त संस्थांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करत संवेदनशीलतेने वागावे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात शासनाने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळा २०२७ आणि ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. अति महत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर व भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, गर्दी नियंत्रण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, आपत्कालीन यंत्रणा आणि पार्किंग व्यवस्था यांचे चोख नियोजन करावे. महसूल, कृषी, जलसंपदा, जलसंधारण, पशुसंवर्धन व ग्रामविकास विभागांनी परस्पर समन्वय राखून ही कामे पार पाडावीत. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर केली.
Source: Cosmo News Desk










