Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • लोहा तालुक्यात ४० टन मका मुरघासाची निर्मिती; पशुपालकाचा आदर्श उपक्रम
Maharashtra

लोहा तालुक्यात ४० टन मका मुरघासाची निर्मिती; पशुपालकाचा आदर्श उपक्रम

मका मुरघास आणि चारा व्यवस्थापनाची पाहणी करताना अधिकारी व शेतकरी

नांदेड | जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील कारेगाव येथील प्रगतिशील शेतकरी सुधाकर किरवले पाटील यांनी केलेल्या चारा व्यवस्थापनाचा आदर्श इतर पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. त्यांनी जमिनीत खड्डा तयार करून सुमारे ४० टन मका मुरघासाची निर्मिती आणि साठवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी सोयाबीन कुटाराचा मुबलक साठाही उपलब्ध करून ठेवला आहे. त्यांच्या या चारा व्यवस्थापनाची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.

चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन

पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किरवले पाटील यांच्या फार्मला भेट देऊन पशुधनाची सद्यस्थिती, उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, तसेच चारा साठवणुकीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. वर्षभर हिरवा चारा मिळावा यासाठी त्यांनी सुपर नेपियर आणि मका पिकांची लागवड केली असून सिंचनाची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. तसेच आगामी रब्बी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी त्यांनी अनुदानित चारा बियाणे मिळण्याबाबत अर्जही सादर केला आहे.

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

या पाहणी दौऱ्यादरम्यान परिसरातील शेतकरी व पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबवण्यात आले. यात मुरघास निर्मिती, सोयाबीन कुटाराचे संवर्धन, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून पौष्टिकता वाढवणे, सुपर नेपियर लागवड आणि चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. गौतम खिल्लारे आणि डॉ. बालाजी जाधव या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर पशुपालकांनीही या नियोजनाचा आदर्श घेऊन संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts