नाशिक | नाशिकरोड जवळील नांदूर गावात विनापरवाना परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघडकीस आला आहे. एफडीएच्या औषध विभागाच्या परिमंडळ दोनच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) संबंधित कारखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल ५४ लाख ५१ हजार रुपये किमतीचा परफ्यूमचा साठा जप्त करण्यात आला असून, यामध्ये ३ हजार ३५२ बाटल्यांचा समावेश आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
सप्तशृंगीनगर येथील मे. डिजिप्रेन्युअर रिटेल प्रा. लि. या आस्थापनामध्ये कोणкаही परवाना नसताना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन केले जात असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली असता, तेथे उत्पादित करण्यात येत असलेल्या परफ्यूमच्या पॅकिंगवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद केलेला नसल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने पंचांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष छापा टाकून संपूर्ण साठ्याचा पंचनामा केला आणि तो जप्त केला. जप्त केलेल्या परफ्यूमचे नमुने पुढील तपासणी तसेच विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित उत्पादक, उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादन परवान्याची वैधता याबाबत सध्या सखोल तपास सुरू आहे.
प्रशासनाची कठोर कारवाईची भूमिका
तपासाअंती कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) अशोक बर्डे, सहायक आयुक्त सुरेश देशमुख व चंद्रकांत मोर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. दरम्यान, एफडीएच्या औषध विभागाने अवैध उत्पादन आणि विक्रीविरोधात कारवाईचा धडाका लावला असून, गेल्या महिनाभरात सुमारे एक कोटी रुपयांचा अवैध साठा जप्त केला आहे. यापूर्वी टक्कल पडलेल्या ठिकाणी केस उगविण्याच्या दाव्याने विक्री होणाऱ्या व्ही. एस. ऑइलच्या विक्रेत्यांवर कारवाई करत ५६ लाख रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला होता, त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई झाली आहे.
Source: Cosmo News Desk






