नाशिक | सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात दीर आणि भावजयीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील थोरात (२६) आणि वैष्णवी थोरात (२५) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. शनिवार (दि. २८) सकाळी ही घटना उघडकीस आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
घटना कशी उघडकीस आली
मिळालेल्या माहितीनुसार, थोरात यांच्या राहत्या घरापासून शंभर फुटांच्या अंतरावर असलेल्या शेतगट क्रमांक ७४४ मधील स्टोअर रूममध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आले. शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोघेही घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच चर्चा सुरू झाली.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज व तपास
सकाळी ही घटना समोर आल्यानंतर गावकामगार पोलिसपाटील सोमनाथ शिंदे यांनी त्वरित वावी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हे प्रकरण प्रेमप्रकरणातून घडले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत वैष्णवी थोरात यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.
Source: Cosmo News Desk





