सोलापूर | देशातून तसेच परदेशातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या डोळ्यांसमोर ठेवून पंढरपूर कॉरिडॉरचा विकास आराखडा आगामी ५० वर्षांचा काळ गृहीत धरून तयार करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, मीनाक्षी वाकडे, सुनील माने, प्रीतम कुंटला आणि संग्राम पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या आषाढी वारीत जवळपास ३२ लाख वारकरी पंढरपुरात आले होते आणि दर्शनरांग २२ किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. सध्या पंढरपूर शहरात ३० ते ३५ लाख भाविकांची गर्दी सांभाळण्याची क्षमता नाही, त्यामुळे कॉरिडॉरच्या माध्यमातून ही क्षमता वाढवणे गरजेचे आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात दर्शनरांगेत किमान दोन लाख भाविक सामावून घेता येतील अशी रचना विकसित करावी, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
निधी आणि पायाभूत सुविधांचे नियोजन
राज्य सरकारने पंढरपूर कॉरिडॉरसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दर्शन मंडपाकरिता मंजूर करण्यात आलेल्या १२९ कोटी रुपयांच्या निधीमधून चालू असलेले काम कॉरिडॉरच्या एकत्रित आराखड्यात समाविष्ट करण्यात यावे. दर्शन मंडपात येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील याची खबरदारी घ्यावी आणि भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन दर्शनरांगेची आखणी करावी. कॉरिडॉरच्या अंतर्गत कुठलीही नवी इमारत किंवा बांधकाम करताना कोणत्याही वास्तूची किंवा स्ट्रक्चरची उंची श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य शिखरापेक्षा जास्त असणार नाही, याची विशेष काळजी घेतली जावी, अशा निर्देशही देण्यात आले आहेत.
चंद्रभागा नदीकाठचा विकास आणि सादरीकरण
चंद्रभागा नदीकाठचे वाळवंट क्षेत्र हे भाविकांच्या गाढ श्रद्धेचा केंद्रबिंदू असून वारीच्या वेळेस तिथे हजारो वारकरी पूजा, भजन व विठ्ठल आराधना करतात. त्यामुळे वाळवंटाचा विकास करताना मूळ वाळवंटाच्या स्वरूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही तीरांवर अयोध्येतील शरयू नदीवरील घाटांच्या धर्तीवर भव्य घाटांची निर्मिती करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. बैठकीदरम्यान दोन खाजगी आर्किटेक्चर एजन्सींनी पालकमंत्र्यांसमोर कॉरिडॉरच्या आराखड्याचे सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहिल्यानंतर त्यांनी भविष्यातील भाविकांची वाढती संख्या, दर्शन व्यवस्था, सुरक्षा, धार्मिक परंपरा आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा अचूक ताळमेळ साधून अंतिम आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना दिले.
Source: Cosmo News Desk











