नाशिक | जिल्ह्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा परिणाम आता ग्रामीण भागात तीव्रतेने जाणवू लागला आहे. पावसाअभावी भूजल पातळीत घट झाली असून विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोतांनी तळ गाठल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यंदा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
टँकर आणि टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात १६ नोव्हेंबर रोजी १३१ गाव-वाड्यांमध्ये ८४ हजार ५०२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र २६ नोव्हेंबरपर्यंत ही परिस्थिती आणखी बिकट झाली असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या २०५ वर पोहोचली आहे. यामध्ये ५५ गावे आणि १५० वाड्या-पाड्यांचा समावेश आहे. केवळ दहा दिवसांत टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या ३० हजार ९६४ ने वाढून १ लाख १५ हजार ४६६ वर पोहोचली आहे. चार तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही टंचाई आता सहा तालुक्यांपर्यंत पसरली असून यात नांदगाव आणि सिन्नर तालुक्यांचाही समावेश झाला आहे.
प्रशासन आणि टँकरची सद्यस्थिती
पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. १६ नोव्हेंबरला ४३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता आणि शासकीय टँकरची संख्या शून्य होती. २६ नोव्हेंबरपर्यंत दोन शासकीय टँकर सुरू करण्यात आले असून उर्वरित ६० टँकर खासगी आहेत. अशा एकूण ६२ टँकरद्वारे दररोज १२८ फेऱ्या मारल्या जात आहेत. १० दिवसांपूर्वी सुरू असलेल्या ४३ टँकरांच्या तुलनेत टँकरची संख्या १९ ने तर फेऱ्यांची संख्या ४८ ने वाढली आहे.
Source: Cosmo News Desk









