नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाच भाऊबीजेदिवशीच ही हृदयद्रावक घटना घडल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वाघेरे येथील रहिवासी आणि सध्या कल्याण फाटा, कल्याण, जि. ठाणे येथे राहणारे सुरेश नामदेव भोर हे आपल्या कुटुंबासह दिवाळीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणाच्या लगत रहिवासी असलेले उत्तम चव्हाण यांच्याकडे भाऊबिजेसाठी आले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
सुरेश भोर हे बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या दोन मुलींसह आंघोळीसाठी धरणाजवळ गेले होते. आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले असताना अचानक पाण्याचा अंदाज आला नाही. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात वडील आणि दोन्ही मुली पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश
या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस करीत आहेत.
Source: Cosmo News Desk






