नाशिक | सिंहस्थ कुंभपर्व २०२७ च्या तयारीला ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याने औपचारिकता मिळाल्यानंतर, आता भाविकांच्या सोयीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. या डिजिटल मंचाच्या माध्यमातून भाविकांना कुंभमेळ्याशी जोडलेली सर्वृत माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे. देश-विदेशातून येणारे भाविक, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्र आणि प्रसारमाध्यमांसाठी हे दालन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भाविकांसाठी सोयी आणि प्रवासाचे नियोजन
कुंभयात्रेला येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून या पोर्टलवर पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, तसेच धार्मिक स्थळांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यामध्ये ऐतिहासिक परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांचा देखील समावेश असेल. तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गांचे पर्याय समजण्यास मदत होईल. भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेत स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, निवास व्यवस्था आणि वाहनतळ यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती टप्प्याटप्प्याने जोडली जाणार आहे.
विश्वासार्ह माहितीचा प्रसार करण्याचे आवाहन
कुंभमेळ्याची तयारी ही विविध संस्था आणि विभागांच्या समन्वयाने चालणारी मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे या अधिकृत व्यासपीठावरील अचूक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संबंधित घटकांनी या अधिकृत लिंकचा वापर करून नागरिकांपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवावी, जेणेकरून प्रवाशांचे नियोजन सुलभ होईल आणि कोणत्याही अफवांना थारा मिळणार नाही.
Source: Cosmo News Desk





