नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची दखल आता परदेशातही घेतली गेली आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमेरिकेच्या लक्झेंबर्गमधील राजदूत स्टेसी फेनबर्ग यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना थेट संदेश पाठवून अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
प्रशासनाचे व्यापक नियोजन
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले होते. रामकुंड परिसरातील व्यवस्था, सुरक्षेचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता तसेच विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय अशा महत्त्वपूर्ण बाबींची जबाबदारी महापालिका प्रशासनाने सांभाळली होती. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व व्यवस्थांचे चोख नियोजन करण्यात आले होते.
अमेरिकन राजदूतांकडून अभिनंदन
प्रशासनाच्या या यशस्वी आयोजनाची दखल घेत स्टेसी फेनबर्ग यांनी आयुक्त खत्री यांना संदेश पाठवला. ‘हाय मनिषा, ध्वजारोहण सोहळा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल तुमचे अभिनंदन करायचे होते. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. स्टेसी फेनबर्ग या अमेरिकेतील उद्योजिका आणि गुंतवणूकदार असून, नोव्हेंबर २०२५ पासून लक्झेंबर्गमधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून कार्यरत आहेत. सिंहस्थ २०२७ च्या तयारीतील पहिल्याच मोठ्या सोहळ्याच्या आयोजनाला परदेशातून मिळालेली ही दाद महापालिका प्रशासनासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
Source: Cosmo News Desk







