Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • मालेगावात प्लास्टिकबंदीचा फज्जा, महापालिकेची कारवाई कागदावरच
Nashik

मालेगावात प्लास्टिकबंदीचा फज्जा, महापालिकेची कारवाई कागदावरच

नाशिक | मालेगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असून, यामुळे पर्यावरण, स्वच्छता आणि पशुधनाला मोठा फटका बसत आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे शहरातील अनेक गटारी तुंबल्या आहेत, तर ओवाडी नाल्यातही मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. महापालिकेकडून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी केली जाणारी कारवाई केवळ नावापुरती ठरत आहे. त्यामुळे काही दिवसांतच शहरातील परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गटारी तुंबल्या आणि अस्वच्छता वाढली

शहरातील जुन्या आग्रा रस्त्यावरील ओवाडी नाला परिसरात प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. शहरात पुरेसा कचराकुंडी नसणे आणि घंटागाड्या वेळेत येत नसल्यामुळे नागरिक रस्त्यांच्या कडेला, मुख्य चौकांत तसेच गटारींमध्ये कचरा टाकत आहेत. याचा परिणाम म्हणून गटारी तुंबून सर्वत्र अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. विविध बाजारपेठांमध्ये किरकोळ वस्तूंच्या विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पशू आरोग्याला गंभीर धोका

रस्त्यावर टाकलेला प्लास्टिक कचरा खाल्ल्यामुळे शेळ्या आणि गायींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पशुधन विकास अधिकारी डॉ. जावीद खातीक यांनी माहिती दिली की, प्लास्टिक पिशव्या खाल्ल्याने जनावरांची पचनक्रिया हळूहळू बंद पडते. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते आणि उपचारांनंतरही जनावरांच्या मृत्यूचा धोका कायम राहतो. यामुळे पशुपालकांना नाइलाजाने आपली जनावरे विकावी लागत आहेत. बाजारपेठांमध्ये प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी महापालिकेने कठोर कारवाई करावी आणि व्यापक जनजागृती राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts