नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात असलेल्या बेझे धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.११) घडली. मृतांमध्ये वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बेझे धरणातील दुर्घटना
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणाच्या लगत उत्तम चव्हाण यांचे घर आहे. त्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले भोर कुटुंबातील तिघे जण आंघोळीसाठी धरणावर गेले होते. सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) हे तिघे धरणाच्या पाण्यात उतरले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत सुरेश भोर, ज्योती भोर आणि हर्षदा भोर या तिघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्यामुळे चव्हाण कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source: Cosmo News Desk





