पुणे | आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस दलाने गुन्हे नियंत्रणात उत्तम कामगिरी केली आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवडचा विस्तार पुण्यापेक्षा अधिक होणार असल्याने पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
अंमली पदार्थविरोधी मोहीम आणि युवा पिढी
युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. देशाची प्रगती रोखण्यासाठी आणि युवा पिढीची क्षमता कमी करण्यासाठी अंमली पदार्थ पाठवले जातात, असे नमूद करत पुढील ३ ते ४ वर्षांत देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार, लोकजागृती आणि वितरण साखळी मोडीत काढण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
पोलिसांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि प्रकल्प
शहराची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि पोलिसांना हक्काची घरे देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ताथवडे येथील पोलीस मुख्यालयाच्या जागेच्या ७/१२ उताऱ्याचे हस्तांतरण आज करण्यात आले. चिखलीत नवी इमारत, पिंपरी पोलीस संकुल, आळंदी पोलीस ठाणे, वाकड अपर पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर व वाहतूक कार्यालयासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. डायल ११२ मुळे प्रतिसाद वेळ ३ मिनिटांवर आली असून पिंपरी चिंचवड यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. कार्यक्रमात ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, ४ ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
Source: Cosmo News Desk









