बुलढाणा | पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत पोहोचलेल्या खरीप पिकांना वाचवण्यासाठी पेनटाकळी धरणातील शिल्लक पाणीसाठा तात्काळ सिंचनासाठी खुला करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा केली असून, पाणीवापर समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येत आहे.
वीजजोडणी आणि जलद अंमलबजावणीचे निर्देश
धरणातून पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महावितरणची आवश्यक वीजजोडणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याअभावी सुकत असलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेल्या पिकांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची सूचना
पाणीवाटपाचे नियोजन करताना पेनटाकळी धरणाच्या वरील बाजूकडील तसेच खालील भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाहूगरजांचा समतोल राखला जावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीवाटपात कुठल्याही भागातील शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी यावर समाधान व्यक्त केले आहे.
Source: Cosmo News Desk







