मुंबई | अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापित करण्यात आलेले देशातील पहिले स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करणे, तिचे आधुनिक ज्ञानभाषेत रूपांतर करणे आणि जागतिक स्तरावर तिचा प्रभाव वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच पार्श्वभूमीवर या विद्यापीठाची स्थापना, शैक्षणिक वाटचाल, संशोधनकार्य आणि भविष्यातील विकासाच्या संकल्पनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांची विशेष मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.
‘दिलखुलास’ मुलाखतीची प्रसारण वेळ आणि तपशील
ही विशेष मुलाखत ११ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. श्रोत्यांना ही मुलाखत ‘News On AIR’ या ॲपवर देखील ऐकता येणार आहे. निवेदक आशिष गवांदे यांनी ही मुलाखत घेतली आहे. यादरम्यान स्वतंत्र विद्यापीठाची संकल्पना कशी आकाराला आली, शासनाची भूमिका, विद्यापीठाचा आराखडा आणि रिद्धपूर नगरीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक योगदान यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
विद्यापीठाचे उपक्रम आणि भविष्यातील वाटचाल
मुलाखतीमध्ये प्राचीन हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ आणि ऐतिहासिक साहित्यसंपदेचे जतन, संवर्धन व डिजिटायझेशन करण्याच्या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठामार्फत करण्यात येणारे प्रयत्न, विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधी याविषयी कुलगुरू प्रा. डॉ. आवलगावकर आपले विचार मांडणार आहेत. ही मुलाखत विद्यार्थी, संशोधक, साहित्यप्रेमी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरणार आहे.
Source: Cosmo News Desk






