Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय
Maharashtra

५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील बैठक

मुंबई | राज्यातील ५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका आता विशेष सर्वसाधारण सभेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४ मधील नियम ७६-जी मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा हा निर्णय घेण्यात आला. या बदलामुळे छोट्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कमी कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार

सध्या २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या ई-वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसाठी साधारणपणे ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जातो. मात्र, ५० किंवा त्याहून कमी सभासद असलेल्या संस्थांची निवडणूक विशेष सर्वसाधारण सभेत घेतल्यास ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ९ ते १३ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करणे शक्य होणार आहे. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सेवाभावी वृत्तीने कामकाज पाहत असतात. मात्र, निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांना वारंवार एकत्र येणे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर संस्थेत उपस्थित राहावे लागणे वेळखाऊ व खर्चीक ठरत होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हा प्रस्ताव सादर केला होता.

नियम ७६-जी मधील नव्या तरतुदी

प्रस्तावित सुधारणेनुसार, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत आणि विशेष सर्वसाधारण सभेच्या किमान सात दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभेची नोटीस देणे अनिवार्य असणार आहे. ही विशेष सर्वसाधारण सभा थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल आणि सभेतच निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्याच्या दोन दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपला अहवाल निबंधकांकडे सादर करावा लागेल. त्यानंतर निबंधकांनी अहवाल मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत नवीन समिती गठीत करावी, अशी तरतूद या प्रस्तावात करण्यात आली आहे. सहकार मंत्र्यांच्या बैठकीस प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दिपक तावरे, सह सचिव तथा अप्पर निबंधक संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts