मुंबई | राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ बालकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मुंबईतील विविध शाळांमधील १ हजार ९०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि ज्ञानाधारित उपक्रमांतून सर्वांगीण विकास साधणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
विविध वयोगटांसाठी विविध उपक्रम
नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन्स लिटरेचरचे संपादक दीप सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुश्री वेंकटेश यांच्या माध्यमातून ‘कलेतून कथाकथन’ उपक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये ५०० विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ई-पुस्तकालयाची ओळख आणि प्रश्नमंजुषा हा उपक्रम पार पडला, ज्यामध्ये ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हे सर्व उपक्रम सकाळी १० ते दुपारी १२.४५ या वेळेत वेगवेगळ्या वयोगटांसाठी राबविण्यात येत आहेत.
२९ नोव्हेंबरपर्यंत चालणार विविध कार्यक्रम
महोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे उपराज्यपाल सरदार तरनजीत सिंग संधू यांच्यासोबत राजनैतिक चातुर्याविषयी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचबरोबर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी ‘भेटा तुमच्या सुपरहिरोला’ या विशेष सत्रातून संवाद साधता येईल. २७ नोव्हेंबर रोजी विज्ञानविषयक उपक्रम आणि मातीची खेळणी बनविण्याची कार्यशाळा होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी कथाकथन, सुलेखन आणि आंतरशालेय वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच २९ नोव्हेंबर रोजी संवादकौशल्य, प्रश्नमंजुषा आणि सजगता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk











