नाशिक | राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नांदेड जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या योजनेमुळे राज्य सरकारची स्थिती ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्यांदाच एका जबाबदार मंत्र्याने अशी कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आर्थिक कसरत आणि ठेकेदारांची देयके
सध्या या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेमुळे आणि संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीमुळे सध्या सरकारला मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे, असे झिरवाळ यांनी नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर सांगितले. या योजनेमुळे ठेकेदारांची तब्बल ५० हजार कोटी रुपयांची देयके अडकली असून, त्यामुळे राज्यातील विविध गावांमध्ये ठेकेदारांची आंदोलने सुरू असल्याचेही समोर आले आहे.
दुष्काळ आणि राजकीय चर्चा
पुढे बोलताना त्यांनी १९७२ च्या दुष्काळाची आठवण करून दिली. आज अन्नाची टंचाई नसली तरी पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास मोठा निधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा आणि पुढील वर्षी आर्थिक चणचण भासू शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या संकटकाळात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Source: Cosmo News Desk









