मुंबई | एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३० जून २०२७ पर्यंत राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या समन्वयातून ही कामे करण्याचा निर्णय दुष्काळावरील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत.
विभागांचा समन्वय आणि उद्दिष्टे
मर्यादित कालावधीत राज्यभर मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी जोडलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास कामांचा विस्तार आणि गती वाढण्यास मदत होईल, या व्यावहारिक दृष्टिकोनातून मंत्रिमंडळ उपसमितीने दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही विभागाच्या कार्यक्षमतेवर अविश्वास व्यक्त करणारा नसून सामूहिक जबाबदारीतून उद्दिष्टपूर्तीसाठी आहे. हे दोन्ही विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी पूरक असून यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे शासनाचे ध्येय आहे. संकटाच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक प्रणालींचा वापर आणि मार्गदर्शन
जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ‘जलदर्पण’ पोर्टल, एमएच-युआयडी (MH-UID) आणि जिओ-टॅगिंग यांसारख्या आधुनिक तांत्रिक प्रणालींचा अवलंब केला आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालींचा वापर तसेच कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत मृद व जलसंधारण विभागाकडून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे पूर्ण करून पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
Source: Cosmo News Desk








