Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Maharashtra

दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर अधिकारी

नांदेड | जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी दुष्काळ, पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार भीमराव केराम, प्र. जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाणीपुरवठा आराखडा आणि टँकरबाबत कडक निर्देश

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी ऑगस्ट २०२७ पर्यंतचा सर्वसमावेशक पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. टंचाईग्रस्त गावांना आवश्यकतेनुसार तातडीने टँकर मंजूर करण्यात यावेत आणि यात कोणताही विलंब किंवा हयगय होता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक तालुक्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी आणि जिल्हास्तरावर २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना निधीअभावी प्रलंबित राहू नयेत, यासाठी १९ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा योग्य वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

चारा उपलब्धतो आणि पीक कर्जाबाबत महत्त्वाचे निर्णय

चारा टंचाईवर उपाययोजना करताना ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांना चारा बियाणे वितरित करावे आणि या शेतकऱ्यांकडून शासन योग्य दराने चारा खरेदी करणार असल्याची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल स्कोरची अट न घालता तातडीने सुलभपणे पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि सक्तीची कर्ज वसुली करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. दुष्काळाचा फटका शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि पशुधनाला कमीत कमी बसावा यासाठी सर्व विभागांनी एकत्रित काम करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts