Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक महापालिकेच्या वतीने मागासवर्गीयांसाठी तीन कल्याणकारी योजना प्रस्तावित
Nashik

नाशिक महापालिकेच्या वतीने मागासवर्गीयांसाठी तीन कल्याणकारी योजना प्रस्तावित

नाशिक | नाशिक महापालिकेच्या मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा प्रभावी विनियोग करण्यासाठी समाजकल्याण विभागाने तीन वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रस्तावित केल्या आहेत. शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात मागासवर्गीय घटकांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून प्रामुख्याने रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि उद्यान विकासासारखी कामे केली जातात. मात्र, संबंधित आर्थिक वर्षात विकासकामे पूर्ण न झाल्याने काही निधी अखर्चित राहतो. त्यामुळे मागासवर्गीय घटकांतील व्यक्तींना थेट लाभ मिळावा आणि राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे.

स्वयंरोजगार आणि लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसाहाय्य

पहिल्या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी बँकेकडून स्वयं-सहाय्यता किंवा मायक्रो फायनान्स योजनेतून कर्ज घेतलेल्या मागासवर्गीय महिला, पुरुष संस्था, मंडळे आणि बचतगटांना कर्जाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त अडीच लाख रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे. हा लाभ एकदाच मिळणार आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे, वय २१ ते ३५ वर्षे असणे आणि नाशिक महापालिका क्षेत्रात किमान पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. दुसऱ्या योजनेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. वय १८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, ते महापालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, जातीचा दाखला तसेच संगणक किंवा लॅपटॉप खरेदीचे कोटेशन आणि बिल सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सिटीलिंक बसचा सवलतीचा पास

तिसऱ्या योजनेत इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी घरापासून शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी सिटीलिंक बसचा सवलतीचा पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. सात ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची यादी सिटीलिंककडे पाठवून त्यांना वार्षिक किंवा त्रैमासिक पास दिला जाईल. या पासपोटी होणाऱ्या सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून सिटीलिंकला करण्यात येणार आहे. शुक्रवारच्या महासभेमध्ये या सर्व प्रस्तावांवर मंजुरीसाठी चर्चा होणार असून त्यानंतर या योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts