धाराशिव | दुष्काळासारख्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी शासन आणि नागरिकांनी एकत्रित मिळून काम करण्याची गरज आहे. जलसंवर्धनामध्ये यश मिळवण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. १९ नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, राज्यापालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, प्रा. सुरेश बिराजदार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात उपस्थित होते.
प्रशासन आणि जलसंधारणाच्या उपाययोजना
जिल्हा प्रशासनाकडून सध्या तात्कालिक आणि दीर्घकालीन स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तात्कालिक उपाययोजनांतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि प्रत्येक घरात रोजगार पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. नागरिकांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून पुढील मदतही दिली जाणार आहे. भविष्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून दीर्घकालीन उपायांतर्गत मशीनच्या सहाय्याने नाले रुंद व खोल करण्याचे काम सुरू आहे. तसेच जलसंवर्धनाच्या कामात पाणी फाउंडेशनची मदत घेतली जात आहे, अशी माहिती राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिली. याशिवाय त्यांनी स्वतःच्या त्रिपुरा राज्याचा अनुभव सांगताना डोंगराळ भागात असलेल्या पाणी संकटाबाबत भाष्य केले आणि प्रत्येकाने पाणी वाचवण्याचे आवाहन केले. यावर्षी पाऊस ५० टक्यांनी कमी झाल्यामुळे टंचाई जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांशी संवाद आणि पाहणी
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे हेलिकॉप्टरने आगमन केल्यानंतर बलसूर येथील विविध शेतांना भेटी दिल्या. त्यांनी रमेश हिंगमिरे यांच्या शेतातील पेरू बागेची, शेतकरी माधव नामा कांबळे यांच्या शेतातील ज्वारी पिकाची आणि माणिक साखरे यांच्या ऊस पिकाची पाहणी केली. तसेच बलसुर ग्रामपंचायतीच्या सहभागातून तयार करण्यात येत असलेल्या राम वाकडे ते यासीन डांगे यांच्या शेतापर्यंतच्या नाला सरळीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी कोरड्या असलेल्या बलसुर साठवण तलाव क्रमांक दोनलाही भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ग्रामस्थांनी कृषी सिंचन आणि पाणी उपलब्धतेबाबत मांडलेल्या मुद्यांवर प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Source: Cosmo News Desk









