रायगड-अलिबाग | रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्यामुळे या शहराचे नाव देशाच्या नकाशावर आल्याची भावना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित एका बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महिला व बालविकास आयुक्त वर्षा उंटवाल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन आणि रोजगार वाढीची दिशा
श्रीवर्धनसह रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर या समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ च्या हंगामासाठी ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाले आहे. यामुळे या भागाच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होईल. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सुरक्षितता, पाणी गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल व्यवसाय, छोटे दुकानदार, स्थानिक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पार्किंग आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन करताना खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल आणि एकसमान स्वरूपाचे स्टॉल उभारले जातील.
विकासकामे आणि निधीची तरतूद
श्रीवर्धन शहरात तारांगण आणि पेशवे स्मारकाची कामे अंतिम टप्प्यात असून मुळगाव, जीवना आणि आरावी परिसरातही पर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून चार कोटी रुपयांची तरतूद असून त्यापैकी १ कोटी ४४ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू असून केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडूनही अधिक निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांचा समतोल राखून पर्यटन विकासाला गती दिली जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.
Source: Cosmo News Desk











