मुंबई | दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०९ व्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. या विशेष कार्यक्रमात लोकभवनमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता शपथ
या कार्यक्रमादरम्यान लोकभवन येथे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ देण्यात आली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो. यादरम्यान राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ घेण्यात आली.
संविधानिक मार्गाने मतभेद सोडवण्याचा संकल्प
उपस्थित सर्वांनी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद संविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक जयराज कारभारी हे देखील उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk










