सातारा | एल निनोच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सध्या दुष्काळी संकटाचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याचा कडाका आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या उष्ण हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. याचा थेट ताр ऊस पिकावर पडत असून उत्पादनात १५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी सातारा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे काटेकोर नियोजन, पाचट व्यवस्थापन आणि खोडवा व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
सेंद्रिय मल्चिंग आणि पाचट आच्छादनाचे फायदे
ऊस तोडणीनंतर खोडवा ठेवायचा असल्यास शेतातील पाचट अजिबात जाळू नये किंवा बाहेर काढू नये. ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी मशीनच्या मदतीने पाचटाचे बारीक तुकडे करून ते शेतात पसरून घ्यावे. पाचट लवकर कुजण्यासाठी प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो जिवाणू संवर्धनाचा वापर करावा. या पाचट आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहून पाण्याची बचत होते आणि पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढवता येते.
तसेच, जमिनीची सुपीकता वाढून गांडूळ आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते, ज्यामुळे जमीन भुसभुशीत होते. आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि खुरपणीचा खर्च वाचतो. उन्हाळ्यात जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे मिळणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे वनस्पतींच्या कर्बग्रहणाचा वेग वाढून उसाची जोमदार वाढ होते.
शास्त्रोक्त खोडवा आणि आपत्कालीन पाणी व्यवस्थापन
ऊस तोडणी झाल्यानंतर उरलेले बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत, जेणेकरून जमिनीखालील कोंब जोमदार फुटतात. छाटणीनंतर लगेचच ०.१ टक्के कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करता येईल.
पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी पाचट आच्छादनाचा वापर करून सरी आड सरीने पाणी द्यावे. या तंत्राचा वापर करून शेतकरी कमी खर्चात व कमी पाण्यात खोडव्याचे अधिक उत्पादन घेऊ शकतात.
Source: Cosmo News Desk





