मुंबई | ‘विकसित महाराष्ट्र @ २०४७’च्या उभारणीत बालकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘बालपण आजचे स्वप्न उद्याच्या महाराष्ट्राचे!’ या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय ‘बाल संसद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा, पुणे आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) यांच्या संयुक्त विद्यमाने ही संसद पार पडणार आहे. आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बाल संसदेचे आयोजन आणि उद्दिष्ट
२० नोव्हेंबर २०२६ रोजी यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय बाल संसद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य गितांजली बुटी, अतुल देसाई, प्रविण भुजाडे आणि सदस्य सचिव वंदना जैन उपस्थित होते. या उपक्रमातून बालकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, स्वतःचे मत मांडण्याची संधी देणे आणि राज्याच्या विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. बाल संसदेमुळे बालकांना लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव होण्यास मदत होईल.
बालस्नेही पंचायत उपक्रम आणि सहभाग
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील १०२ ग्रामपंचायतींचा ‘बालस्नेही पंचायत’ उपक्रमाच्या नामांकन यादीत समावेश करण्यात आला आहे. अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक आणि नागपूर या सहा महसुली विभागांतील ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी आहेत. बालकांची सुरक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, पोषण, संरक्षण आणि स्थानिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग यावर यामध्ये भर दिला जाणार आहे.
Source: Cosmo News Desk










