नाशिक | सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा सोमवारपासून थाटात प्रारंभ झाला. या नाट्य मेजवानीचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या रंगमंचावर कलाकृती सादर करणे ही कलाकारांसाठी यशाची पहिली पायरी असून, या रंगमचाला नाट्यविश्वात ऐतिहासिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन लक्ष्मण सावजी यांनी यावेळी केले.
उद्घाटन सोहळा आणि ‘अनुभव मंटप’ नाटक
स्पर्धेच्या सुरुवातीला वीरशैव तरुण संघ प्रस्तुत, ॲड. अरुण आवटे लिखित आणि सुरेश गायधनी दिग्दर्शित दोन अंकी ‘अनुभव मंटप’ या नाटकाने रंगमंचावर हजेरी लावली. पहिल्याच दिवशी प्रेक्षकगृह हाऊसफुल्ल झाल्याने नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या नाटकाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचे जीवनकार्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा सामाजिक संदेश देण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मुंबई येथील सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक आदेश जाधव, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ, रवींद्र कदम, सुनील ढगे यांच्यासह परीक्षक उपस्थित होते.
२३ नाटकांचे सादरीकरण आणि स्पर्धा कालावधी
परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात होत असलेल्या या प्राथमिक फेरीत एकूण २३ नाटकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार असून दररोज सायंकाळी सात वाजता नाटक पाहता येणार आहेत. ८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार होत आहेत. या केंद्राच्या फेरीत नाशिकसह धुळे, इंदूर आदी नाट्यसंस्थांकडून सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक आणि समकालीन विषयांवर आधारित नाटके सादर केली जाणार आहेत.
Source: Cosmo News Desk




