नाशिक | वाइन उद्योगाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इटलीने आता वाइननिर्मितीच्या विशेष उपकरणांसाठी नाशिककडे मोर्चा वळवला आहे. नाशिकमधील ‘एनव्हिजन इचिपमेंट्स’ या कंपनीने इटलीतील फ्लॉरेंस शहरासाठी दोन अत्याधुनिक ‘अरोमा मल्टिपलायर टॅक’ची निर्यात केली आहे. वाइन उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करण्यात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या इटलीने भारतातून अशा उपकरणांची आयात करण्याची ही पहिलीच घटना आहे.
इटलीला पाठवली ३२०० लिटर क्षमतेची यंत्रसामग्री
चालू महिन्याच्या सुरुवातीला नाशिकमधील कंपनीने ही निर्यात पूर्ण केली. पाठवण्यात आलेल्या दोन टँकपैकी एकाची क्षमता दोन हजार लिटर आणि दुसऱ्याची क्षमता एक हजार दोनशे लिटर आहे. अशा एकूण तीन हजार दोनशे लिटर क्षमतेची यंत्रसामग्री मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा) येथून इटलीकडे रवाना झाली. या निर्यातीचे व्यावसायिक मूल्य सुमारे २१ हजार डॉलर म्हणजेच अंदाजे १८ लाख रुपये इतके आहे. ही पहिली खेप मर्यादित असली, तरी इटलीतील खरेदीदारासोबत आगामी काळात आणखी दहा यंत्रांच्या निर्यातीबाबत चर्चा सुरू आहे.
मेक इन इंडियाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठसा
एनव्हिजन इचिपमेंट्सचे सीईओ संजय झा आणि ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. मूळचे मुंबईचे असलेले जगदीश होळकर यांनी २००३ मध्ये ३५ कामगारांसह विल्होली येथे कारखाना सुरू केला होता. वाइन क्षेत्रात अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या इटलीला आपल्याकडील यंत्रसामग्री निर्यात होणे ही वाइन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत आपण वाइन निर्मितीसाठी लागणारे मशीनरी, बॉटल्स, पॅकेजिंग मटेरियल, ओक बॅरल्स आणि यिस्टम केमिकल्स परदेशातून विशेषतः इटलीतून आयात करत होतो, मात्र आता आपण त्यांना मशीनरी निर्यात करायला सुरुवात केली आहे.
Source: Cosmo News Desk






